सांगली : महापालिकेच्या महावीर उद्यानातील विकास कामांच्या उद्घाटनावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला. महापौर शिकलगार यांनी जिल्हा परिषद निवडीचा संदर्भ देत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची मागणी केली, तर जयंतरावांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुराव्यामुळेच काही प्रश्न तयार होत असल्याचे सांगत, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी न झाल्याचे शल्य अप्रत्यक्षपणे बोलून दाखविले. नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, अंजना कुंडले यांच्या प्रभागातील महावीर उद्यानात आकर्षक विद्युत दिवे, साऊंड सिस्टिम व मुलांची खेळणी अशी तब्बल २० लाखांची कामे पूर्ण करण्यात आली असून, मंगळवारी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते या कामांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. सुरुवातीला उद्यानाच्या विकासाचे श्रेय कुणाचे? यावरून महापौरांनी राष्ट्रवादीला छेडले. ते म्हणाले की, मदनभाऊ पाटील यांनी या उद्यानाच्या जागेबाबत निर्णय घेतला. त्यानंतर सुरेश पाटील महापौर असताना २० लाख रुपयांची तरतूद करून विकासाची सुरूवात झाली, हे सांगताना त्यांनी विकासाचे श्रेय जयंतरावांना दिले. महाआघाडीच्या काळात उद्यानात मोठी कामे झाल्याचेही कबूल केले. त्यानंतर महापौरांनी आपला मोर्चा आगामी महापालिकेच्या निवडणुकीकडे वळविला. त्यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा संदर्भ दिला. शिकलगार म्हणाले की, गेल्या काही निवडणुकांत काय घडले, हे साऱ्यांनाच माहीत आहे. आजच अध्यक्ष निवडीचा निकाल लागला आहे. त्यातून तरी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे सूचित करतानाच त्यांनी, अप्रत्यक्षपणे आगामी निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत दिले. हे सांगताना त्यांनी आपल्या महापौर पदावरही टिपणी केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सारेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. मीच केवळ काँग्रेसचा दिसतो. त्यामुळे माझे महापौरपद संकटात येते की काय, असे म्हणत त्यांनी जयंतरावांकडे कटाक्ष टाकला. महापौरांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी सुरुवातीला उद्यान विकासाबाबत भूमिका मांडली. त्यांनाही महापौरांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह आवरला नाही. जिल्हा परिषद निवडणूक आणि त्यानंतर मंगळवारी झालेल्या अध्यक्ष निवडीवर अप्रत्यक्ष भाष्य करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील दुराव्यामुळेच काही प्रश्न तयार झाल्याचे सांगितले. जाता जाता महापौरांचे कौतुक करीत त्यांनी पदभार हाती घेतल्यापासून काही चांगली कामे केली आहेत. त्यांच्या चांगला कामाच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहतील, असेही आश्वासित केले. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दुराव्यामुळे प्रश्न तयार होतात
By admin | Published: March 21, 2017 11:38 PM