जगदीश धुळूबुळू , मिरज : मिरज पूर्वभागात राष्ट्रवादीने स्थान बळकट केले असून, पक्षाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा येथे मोठा गट आहे. मात्र आता जिल्ह्यातील दुष्काळी फोरमने भाजपशी जवळीक केल्याने पूर्वभागात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी फोरमसोबत असलेले घोरपडे भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास येथील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी फोरमचे नेते खासदार संजय पाटील यांनी भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळविला. त्यांच्या विजयाने फोरमच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता हा फोरम भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मिरज पूर्वभाग व विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे नेतृत्व करणारे घोरपडेही दुष्काळी फोरममध्ये आहेत. त्यांनी यापूर्वी कवठेमहांकाळ विधानसभा मतदासंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मिरजेतील कार्यकर्त्यांची फौज संजय पाटील यांच्या प्रचारात उतरवली होती. घोरपडे गटाची सत्ता असणार्या गावांत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले आहे. आता संजय पाटील हे विधानसभेला घोरपडेंचा ‘पैरा’ फेडणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक घोरपडे तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून लढविण्याची चिन्हे दिसत आहेत. मिरज पूर्वभागात ‘राष्ट्रवादी म्हणजे घोरपडे गट’ असे समीकरण आहे. अनेक गावांत राष्ट्रवादीची पर्यायाने घोरपडे गटाची सत्ता आहे. येथे काँग्रेसचेही प्राबल्य असून, या भागातील सोसायट्या, ग्रामपंचायतींपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने टक्कर दिली आहे. गावागावात राष्ट्रवादीने संघर्षातून गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र आता संजय पाटील यांच्याप्रमाणे घोरपडेही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मिरज विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अन्य तालुक्यांप्रमाणे राष्टÑवादीची मिरज पूर्व भागातील चिंता वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळी फोरमच्या नेत्यांमध्ये राष्टÑवादी नेत्यांची संख्या अधिक आहे. आता फोरमचे नेते भाजपच्या मार्गावर असल्याने त्या त्या तालुक्यातील राष्टÑवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. लोकसभा निकालानंतर आता फोरमच्या नेत्यांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत्या काही दिवसात एकूणच मिरज पूर्वसह तालुक्यातील राजकारणात मोठे बदल पहावयास मिळणार आहेत. राष्ट्रवादीचे खिंडार कोण मुजवणार? मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. घोरपडे यांचा मोठा गट असतानाही त्यांना येथून वाव नाही. त्यांना तासगाव-कवठेमहांकाळमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. ते भाजपमध्ये गेल्यानंतर पूर्वभागातील राष्ट्रवादीत दुसरे नेतृत्व नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला पडणारे खिंडार मुजविण्यासाठी राष्ट्रवादीकडे सध्या कोणताही पर्याय नाही. भाजपला फायदा लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य देण्यात राष्ट्रवादीतील घोरपडे गटाचा महत्त्वाचा वाटा आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागात भाजपकडे कार्यकर्त्यांची वानवा आहे. घोरपडेंच्या पक्षप्रवेशाने तेथे भाजपला तयार कार्यकर्ते मिळणार आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढून पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो.
राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचा प्रश्न
By admin | Published: May 25, 2014 12:46 AM