अविनाश बाड ल्ल आटपाडीअत्यंत चिवट, देखण्या आणि प्रचंड रोगप्रतिकारशक्ती असलेल्या माणदेशी खिलार पशुधनावर गेली तीन-चार वर्षे भीषण दुष्काळाने घाला घातला आहे. न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवर बंदी घातल्याने शर्यतीच्या खोंडांची पैदास आणि संगोपन करणारे शेतकरी आगीतून फुफाट्यात पडले आहेत.देखणी खिलार गाय आणि देखणी खोंडं हे माणदेशाचं वैभव आहे. जातीवंत देखणी, चपळ, काटक, रूबाबदार खिलार खोंडं जगाच्या पाठीवर फक्त माणदेशातच पहायला मिळतात. दुभत्या म्हैशी आणि संकरित गार्इंच्या दुधाच्या मागे लागल्याने माणदेशाचं हे वैभव आता लोप पावत चाललं आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या खिलार जनावरांचं संगोपन करणं परवडत नाही. गाईचे दूध संकरित गाईच्या दुधाच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात निघते. त्या दुधामध्ये, दुधापासून तयार केलेल्या तुपामध्ये खूप गुणधर्म असले तरी, दूध उत्पादनाचे प्रमाण कमी असते. याशिवाय यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या कामासाठी बैलजोडी वापरण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. त्यामुळे शेतीकामासाठी विकल्या जाणाऱ्या बैलजोडीला कमी किंमत मिळत आहे.शर्यतीसाठी कुठेही जे बैल वापरले जातात, त्या सर्व बैलजोड्या माणदेशी खिलार असतात. अत्यंत देखणी आणि चपळ असलेली खिलार खोंडे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत शौकीन खरेदी करतात. या भागातील पशुपालकांना शर्यतीचा मोठा आधार होता. या जातीच्या गाईमध्ये मोठा भाकडकाळ असतो. अत्यल्प प्रमाणात दूध निघते. त्यामुळे हा वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण राज्यात शर्यतीसाठी सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खोंडांची पैदास करतात. गुणवत्तेच्या जोरावर कॅनडा आणि श्रीलंकेतही माणदेश खिलार पोहोचला आहे. युरोपीय देशांनी खिलार जनावरांच्या रक्तातील प्रचंड रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग स्थानिक जनावरांसाठी कसा करता येईल, यासाठी संशोधन सुरू केले आहे.आपल्याकडे मात्र आता हा काटक जनावरांचा वाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही जनावरं टिकली तर इथला शेतकरी टिकेल. शेतकऱ्यांच्या जीवनाचा कणा असणारे खिलार जनावर सध्या धोक्यात आहे. खिलार जनावरांच्या संगोपनासाठी आता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
खिलार पशुधनाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
By admin | Published: July 10, 2014 11:13 PM