लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘साताऱ्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलचा प्रश्न येत्या महिन्याभरात मार्गी लावण्यात येईल,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित केलेल्या आढावा बैठकीनंतर गुरुवारी रात्री उशिरा फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, ‘साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न तुम्ही विचारण्याआधीच मी त्याचे उत्तर देतो. महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वैद्यकीय विभागाच्या मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात हे काम मार्गी लागेल.’साताऱ्यातील शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे काम निधीअभावी रखडल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितल्यानंतर या कामासाठी पाच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, असे मी त्यांना स्पष्ट केले आहे. जिहे-कटापूर योजना राज्यपालांच्या अनुशेषाबाहेर येत नाही, हे लक्षात आल्यानंतर आम्ही प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन केंद्राकडे ४० टक्के खर्च मागितला आहे. ६० टक्के खर्च राज्यशासन करेल. त्यामुळे या योजनेसाठी राज्यपालांच्या सूत्राबाहेर ही योजना आपोआपच आली आहे. ही योजना दिलेल्या वेळेत पूर्ण केली जाईल.वांग-मराठवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सांगली-सातारा या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने समन्वय साधून निकालात काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानात जिल्हा परिषदेने केलेले काम अत्यंत चांगले आहे. गेल्या २५ वर्षांत झाली नाहीत, एवढी कामे गेल्या तीन वर्षांत झाली आहेत. शहरातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यशासन मदत करेल. पंतप्रधान आवास योजनेचेही अतिशय उल्लेखनीय काम साताऱ्याने केले आहे. ज्यांना जागा नाही, त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जमीन दिली जाईल. शासकीय व शेती महामंडळाच्या जमिनी त्यासाठी दिल्या जातील. मी माझे काम करतोशिवसेनेसह विरोधी पक्षांकडून तुम्हाला घेरले जात आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी माझे काम करतो, मला कशाचीच चिंता नाही.’
मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागणार
By admin | Published: May 19, 2017 12:10 AM