सांगली : जिल्ह्यातील ११ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. हा प्रश्न सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत मांडला असून प्रादेशिक योजनांचे वीज बिल औद्योगिकऐवजी कृषिपंपाच्या दराने आकारावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नाची शासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून या योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती मागविली आहे.कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, वाघोली, तुंग, नांद्रे-वसगडे, येळावी, पेड, मणेराजुरी, कवठेमहांकाळ-विसापूर, कुंडल, रायगाव या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना जुन्या आहेत. या योजनांचा देखभाल, दुरूस्तीचा खर्च मोठ्याप्रमाणात वाढला आहे. पाईपलाईनला गळती असल्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काही भागामध्ये तर नियमित पाणी येतच नाही. यामुळे नागरिक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना कंटाळले आहेत. या योजनाच बंद करून नवीन योजनांना मंजुरी देण्याचीही मागणी होत आहे. अकरा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांद्वारे १२४ गावांतील ३ लाख ५२ हजार ८१४ नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, कासेगाव, कुंडल, येळावी ही मोठी गावे आहेत. योजनांना महावितरण कंपनीकडून औद्योगिक दराने विद्युत बिल आकारले जात आहे. यामुळे वसूल होणारी पाणीपट्टी आणि वीज बिलाच्या रकमेचा ताळमेळ जमत नाही. यातूनच थकीत वीज बिलामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रश्नावर आ. गाडगीळ यांनी विधानसभेत आवाज उठविला.प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वारंवार बंद पडत आहेत, त्याची कारणे काय आहेत? वीज पुरवठ्याची औद्योगिक दराऐवजी कृषी पंपाच्या दराने आकारणी का होत नाही? जुन्या पाणी योजना दुरुस्तीसाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे?, या प्रश्नांकडे आ. गाडगीळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. गाडगीळ यांच्या प्रश्नानंतर शासनाने जिल्हा परिषदेकडून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या वस्तुस्थितीचा अहवाल मागविला आहे. (प्रतिनिधी)तीन योजनांचे चालूचे ४५ लाखांचे वीजबिल थकीतजिल्हा परिषदेकडील प्रादेशिक योजनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या तीन योजनांचे वीज कनेक्शन थकीत वीजबिलावरून तोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील येळावी, मणेराजुरी व कवठेमहांकाळ प्रादेशिक योजनांची वीज तोडण्यात आली असून यामुळे ४४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ४५ लाखांच्या चालू थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील येळावी प्रादेशिक योजनेतून ९ गावांना, मणेराजुरी योजनेतून १९, तर कवठेमहांकाळ योजनेतून १६ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. थकबाकीमुळेच बुधवारी योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे ४४ गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
सांगलीतील प्रादेशिक योजनांचा प्रश्न विधानसभेत
By admin | Published: August 19, 2016 11:32 PM