सांगली : गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील खोकीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लागला आहे. १३३ खोकीधारकांचे त्यांनी सुचविलेल्या जागेत पुनर्वसन करण्याबाबतचे लेखी पत्र महापालिकेने दिल्यानंतर खोकीधारकांनी उपोषण सोडले.
गेल्या चार दिवसांपासून येथील खोकीधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बाजूला रस्ता केला जाणार असून, त्यावेळी खोकीधारकांना हटविले जाणार आहे. त्याअगोदर आमचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी खोकीधारकांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.
उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली. त्यामुळे तातडीने महापालिका पदाधिकारी व अधिकारी याठिकाणी दाखल झाले. महापौरांसोबत नगरसेवक संतोष पाटील, जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, कुपवाडचे सहायक आयुक्त जी. टी. भिसे उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. लेखी आश्वासनाची मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्यानंतर महापालिकेच्या लेटरपॅडवर त्यांना पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण सोडले.
विश्रामबाग ते कुपवाड फाटा रस्त्यावर रेल्वे रुळावरून उड्डाणपुलाची अनेक वर्षांपासून मागणी होती. गेल्यावर्षी या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, या मार्गावर असलेल्या १३३ खोक्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित ठेवूनच पुलाचे काम सुरू करण्यात आले. प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यानेच खोकीधारकांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात महेश हरमलकर, मनोज जाधव, महेश गायकवाड, बापू शेंडगे, प्रदीप लोहार, सतीश प्रभावळे, अथररजा कादरी, महेश विचारे हे आठ खोकीधारक उपोषणास बसले होते. अन्य खोकीधारकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आंदोलनामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.याठिकाणी होणार पुनर्वसनखोकीधारकांनी केलेल्या मागणीनुसार कुपवाड फाट्याजवळील नैसर्गिक नाल्यालगत खोकीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. याबाबत दिलेल्या लेखी पत्रात महापालिकेने म्हटले आहे की, पुनर्वसनाचा ठराव महासभेत घेण्यात येईल. त्यानंतर तातडीने याची अंमलबजावणी केली जाईल. शहरात अन्य ठिकाणी ज्याप्रमाणे खोकीधारकांचे पुनर्वसन झाले आहे, त्यापद्धतीने १३३ खोक्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे महापौरांनी येथील खोकीधारकांना सांगितले.गुलालाची उधळण
आंदोलनाला यश आल्यानंतर सर्वच खोकीधारकांनी आनंद व्यक्त केला. उपोषणास बसलेल्या आठजणांचा पुष्पहार घालून सत्कार करतानाच त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.