म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन घेण्यासाठी सांगलीत जिल्हा परिषदेत कोरोना नियंत्रण कक्षाबाहेर रुग्णांचे नातेवाईक अशा रांगा लावत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स घेण्यासाठी जिल्हा परिषदेत रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागल्या आहेत. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी धावाधाव करीत आहेत.
या आजारावरील इंजेक्शन्स खासगी रुग्णालयांत उपलब्ध नाहीत. शासनाने जिल्हास्तरावर ती उपलब्ध केली असून, जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत रुग्णांना दिली जात आहेत. जिल्हा परिषदेत कोरोना नियंत्रण कक्षाशेजारीच त्यांची विक्री सुरू आहे. ती घेण्यासाठी जिल्हाभरातून रुग्णांचे नातेवाईक जिल्हा परिषदेत गर्दी करू लागले आहेत. डॉक्टरांचे पत्र पाहून इंजेक्शन दिले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या सोमवारी १०० झाली. दोघांचे मृत्यू झाले. शासकीय व खासगी अशा १३ रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी डॉक्टर्स इंजेक्शन्ससाठी रुग्णाच्या नातेवाइकांना चिठ्ठी देऊन जिल्हा परिषदेत पाठवत आहेत. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी डॉक्टरांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमार्फत इंजेक्शन्स घेऊन जावीत, रुग्णाच्या नातेवाइकांना पाठवू नये, अशी सूचना केली.
चौकट
दोन इंजेक्शन्ससाठी ५ हजार ८०० रुपये
म्युकरमायकोसिससाठीची दोन इंजेक्शन्स ५ हजार ८०० रुपयांना दिली जात आहेत. हा दर सवलतीचा आहे. प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांच्या शिफारशीनुसार तीन ते दहा इंजेक्शन्स दिली जात आहेत. कोरोना उपचारांपेक्षा म्युकरमायकोसिसवरील औषधोपचाराचा खर्च जास्त होत आहे.