लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे लर्निंग लायसन्ससह फिटनेस प्रमाणपत्र व इतर कामासाठी अर्ज करूनही ३० सप्टेंबरपर्यंतचा काेटा फुल्ल झाल्याने अनेकांना अडचणी येण्याची शक्यता आहे. आरटीओनी ऑगस्टपासून शनिवार व रविवारीही काम करत प्रकरणांचा निपटारा सुरू केला असला, तरी वाढलेले अर्ज आणि कमी मनुष्यबळासह ऑनलाईन, ऑफलाईनमुळे अडचणी येत आहेत. परिणाम, अनेकांचे लर्निंग लायसन्स बाद होण्याचीच भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासनाकडून यास मुदतवाढीची शक्यता असून दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागास ठरवून दिलेल्या कोट्यानुसार सध्या काम सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात २५० वर असलेला कोटा नंतर ५० ने वाढविण्यात आला होता. कोटा वाढविला, तरी अर्जदारांची संख्या वाढतीच आहे. यावर पर्याय म्हणून प्रशासनाने तेव्हापासूनच शनिवार, रविवारीही आपले कामकाज सुरू ठेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा सुरू ठेवला असला,तरी या महिन्याचा कोटाच पूर्ण झाल्याने अनेकांना अडचणी येणार आहेत.
चौकट
काय आहेत अडचणी?
१) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अर्ज केल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते. मात्र, सध्या विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ नाही. ज्यांची बदली झाली ती पदे भरण्यात आली नाहीत.
२) आहे त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करताना यामुळे ताण येत असून ती पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
३) या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ कामास लावून अजून काही प्रस्ताव पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
चौकट
तारीख मिळालेले येत नाहीत, येणाऱ्यांना तारीख नाही
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अनेकांना तारीख मिळाली आहे. मात्र, यातील अनेक जण कार्यालयाकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे अडचणी येत आहेत. ज्यांना पूर्तता करायची अपेक्षा आहे, अशांना तारीख मिळत नसल्याची अवस्था आहे.
चौकट
रोजचा कोटा ५० वर
प्रशासनाने रोज किमान ५० चा कोटा निश्चित केला आहे. त्यानुसार तारीख दिली जाते. मात्र, तारीख मिळूनही अनेकजण येत नसल्याचे दिसून येते.
कोट
निश्चित केलेला कोटा पूर्ण करण्यासाठी सुटीदिवशीही कामकाज सुरू आहे. यामुळे अडचणी येणाऱ्या सोडविण्यासाठी मुदतवाढीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यावर निर्णय झाल्यावरच अंमलबजावणीबाबत ठरवता येणार आहे.
विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.