सांगली : राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकार मात्र त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे राज्यात तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचा विकास केंद्रबिंदू मानून काम करण्याऐवजी उद्योजकांना पायघड्या पसरणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आता ‘आर या पार’ची लढाई उभारणार असल्याचा इशारा किसान सभेचे राज्य सरचिटणीस किसन गुजर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. किसान सभेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने गुजर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अधिवेशनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजर पुढे म्हणाले की, शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत असताना शेतीतील उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. त्याचबरोबर शेतकरी कसत असलेल्या देवस्थान जमिनी, इनाम जमिनी, गायरान जमिनी व वन जमिनी अजूनही सरकारच्या नावावर आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसारख्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी हैराण झाले असताना, सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी २९ मार्चला नाशिक येथे महामुक्काम मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातून या आंदोलनात लाखाहून अधिक शेतकरी सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. अजित नवले, दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी, विजय गुरव, दिलीप शुक्ला, जयकुमार सकळे, मस्जीद शिरोळकर, बाळासाहेब गुरव, जावेद मुजावर, गवस शिरोळकर आदींची कार्यकारिणी निवडण्यात आली. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता ‘आर या पार ची’ लढाई
By admin | Published: February 14, 2016 12:45 AM