सांगली : मोठमोठ्या महापुरांचा सामना करूनही सांगलीकरांची इमानेइतबारे सेवा करणाºया व समृद्धीचा सेतू बनून सांगलीकरांच्या हृदयात घर केलेल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला आज, सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. या पुलाच्या उभारणीवेळी मजूर म्हणून राबलेल्या सांगलीच्या लक्ष्मीबाई कामन्ना पुजारी (वय १०४) यांनी त्यावेळच्या अनेक आठवणी जागविल्या. आयर्विनच्या नव्वदाव्या वर्धापनदिनी त्यांचा सत्कार सांगलीकरांच्यावतीने करण्यात येणार आहे.
सांगलीचा आयर्विन पूल हा १८ नोव्हेंबर १९२९ रोजी सांगलीकरांच्या सेवेत दाखल झाला. त्यापूर्वी सुमारे तीन ते चार वर्षापूर्वी याच्या कामास सुरुवात झाली होती. लक्ष्मीबार्इं पुजारी यांनी या पुलाच्या उभारणीत कष्ट उपसले होते. लक्ष्मीबाई या मूळच्या कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील तोदलबगीच्या. कर्नाटकातील मजुरांच्या टोळीने त्यांच्या कुटुंबीयांना या कामासाठी सोबत घेतले. जमखंडी, विजापूर परिसरातील शेकडो मजुरांच्या टोळ्या आयर्विन पुलाच्या कामासाठी सांगलीत दाखल झाल्या. पाणी अडविण्याच्या कामापासून त्यांची सुरुवात झाली होती. त्यावेळी लक्ष्मीबाई दहा वर्षाच्या होत्या. इतक्या लहान वयातही त्यांना खडीने भरलेल्या पाट्या उचलून डोक्यावरून वाहण्याचे काम कुटुंबीयांनी दिले होते.
दोन वर्षे त्यांनी याठिकाणी काम केले. पुलाचे खांब उभारल्यानंतर काही मजूर गावाकडे परतले, त्यात लक्ष्मीबार्इंचे कुटुंबही होते. लक्ष्मीबार्इंचा त्यानंतर १२ व्या वर्षी विवाह झाला. कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीमुळे लक्ष्मीबाई पतीसमवेत सांगलीत आल्या आणि मिळेल तिथे झोपडी बांधून राहत होत्या. हळदीच्या कारखान्यासह रुग्णालय, अनेकांच्या बागांमध्ये त्या राबत होत्या. लक्ष्मीबार्इंचे पती, त्यांची पाच मुले व दोन मुली आता हयात नाहीत. नातवंडेही विविध कारणांनी मृत्युमुखी पडली. परतवंडांपैकी केवळ मीनाक्षी या एकट्याच जिवंत आहेत.