सदानंद औंधेमिरज : मिरजेत गणेश तलावात पोलिसांच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर तराफा उलटल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पोहोता येत असल्याने पाण्यात पडलेले सर्व पोलिस कर्मचारी सुरक्षित काठावर पोहोचले. मिरजेत आज, शुक्रवारी सकाळी गणेशविसर्जन मिरवणूक संपल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या गणेश मंडळांची मिरवणूक काढण्यात आली. पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. बॅन्ड, बॅजो, डीजेच्या तालावर पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरिक्षक संजीव झाडे यांच्यासह महिला व पुरुष कर्मचार्यांनी मिरवणुकीत ताल धरला. गणेश तलावात विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. विसर्जनासाठी तराफ्यावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. उत्साहात तलावात मध्यभागी आरती करण्यासाठी भटजीलाही सोबत घेण्यात आले होते. तलावातून काठाकडे परत येताना गर्दीमुळे व वजन जास्त झाल्याने तराफा उलटून सर्वजण पाण्यात पडले. मात्र पोलिस कर्मचार्यांना पोहोता येत असल्याने सर्वजण काठावर सुरक्षित पोहोचले. पोहता येत नसलेल्या भटजींनाही तराफ्यावर चढवून काठावर आणण्यात आले. या घटनेची शहरात चर्चा होती.
Sangli: मिरजेत पोलिसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करताना तराफा उलटला, सर्व पोलीस सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 6:33 PM