अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सावरकर हे इंग्रजाचे नोकर होते, असे संबोधून राहुल गांधी यांनी सावरकरांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचा आणि स्वातंत्र्य काळात ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा वीरांचा अपमान केला आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत असताना अंदमानचा कारावास भोगला, स्वतःचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले, त्यांच्याबाबत उच्चारलेले अपशब्द आम्ही कदापी सहन करणार नाही. यापूर्वीही राहुल गांधींनी सावरकरांविरोधात अपशब्द उच्चारले होते. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. अशाप्रकारे वारंवार सावरकरांविरोधात अपशब्द उच्चारून, अपमान करून काँग्रेसला मते मिळतील, असे राहुल गांधीना वाटत असेल तो फार मोठा गैरसमज आहे. त्यांनी हे उद्योग ताबडतोब थांबवावेत. महाराष्ट्राची व देशाची जनता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही.
राहुल गांधी यांनी वापरलेले अपशब्द, त्यांनी ताबडतोब मागे घेऊन महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"