शिराळा : मुख्य वन्यजीव संरक्षक राहुल पाटील यांचे सामाजिक कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन शिराळाचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयास मुख्य वन्यजीव संरक्षक अधिकारी राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून कॅपिटालँड कंपनी पुणे व स्वराज्य फाउंडेशन बिळाशी यांच्यातर्फे एक लाख रुपये किमतीचे ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ देण्यात आली. यावेळी गणेश शिंदे बोलत होते.
उपजिल्हाधिकारी ओंकार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, पाटील यांनी प्रशासकीय सेवा बजावत आपल्या गावाकडील माणसांसाठी आपण काहीतरी समाजकार्य केले पाहिजे या हेतूने त्यांनी गतवर्षीच्या महापुरावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट, सुरुवातीच्या कोरोनाकाळात तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, बिळाशी परिसरातील वाड्या-वस्त्यांवर चांगल्या दर्जाचे मास्क व सॅनिटायझर वाटप केले होते. त्यांनी स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू ठेवलेले सेवाव्रती कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.
याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जलील मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद, डॉ. विनायक धस, डॉ. मयुरी राजमाने, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील, पदाधिकारी चंद्रकांत शिंदे, धोंडीराम कुंभार, उमेश खोत, प्रकाश पाटील, सचिन पाटील, दीपक रोकडे, गणेश पाडळकर, प्रताप पाटील, समीर मुलाणी आदी उपस्थित होते.