सांगली : शहरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यात १६ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी तीन पथक तयार करत ही कारवाई केली.
विश्रामबाग येथील रेल्वे स्टेशन ते शंभरफुटी रोडवर असलेल्या एका टेरेसवर सुरु केलेला जुगारअड्डा उद्ध्वस्त केला. यात जुगारअड्डा मालक विजय गुराप्पा वडर, मारुती जगन्नाथ वडर, गणेश शिवाजी वाघ, अब्दुलगणी कुदुस साहेब (सर्व रा. वडर कॉलनी,सांगली) आणि अरुण शिवलिंग सावंत (रा. गंगानगर) यांना अटक करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतदादा क्रीडा संकुलातील व्यायाम शाळेच्या अंगणात जुगार खेळत बसलेल्या पाचजणांवर कारवाई करण्यात आली त्यात महमद इमाम डोणी (कत्तलखान्याजवळ,सांगली), महेश अशोक सकपाळ (गावभाग,सांगली), मुत्वयाण्णा सोमाण्णा दोडमणी, अनिकेत प्रकाश माने, विशाल वसंत पाटील (सर्व रा. सांगलीवाडी) यांना अटक करण्यात आली.
मिरज-म्हैसाळ रोडवर असलेल्या देवल मळा परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. यात जुगार अड्डा मालक सलीम रहमान फकीर, अर्थव अशोक पाटील, साहिल अफसर कुटवाडे, शानुर गजब्बर मकानदार, समीर दादुल झांबरे आणि पुंडलिक मल्लाप्पा वागण्णावर (सर्व रा. म्हैसाळ, ता.मिरज) यांना अटक करण्यात आली.
तिन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत रोख १० हजार २७० रुपयांसह २६ हजार १०० रुपये किमतीचे मोबाईल व जुगार साहित्य असा ३६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सूर्यवंशी, निलेश कदम, अरुण औताडे, जितेंद्र जाधव, शशिकांत जाधव आदीच्या पथकाने ही कारवाई केली.