सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर अनुराधा हॉटेलसमोरील लॉजमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत लॉज मालकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी अजय नेमगोंडा कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी लॉज मालक रणजित रघुनाथ चव्हाण (दक्षिण शिवाजानगर, सांगली) यांच्यासह अलोक अनिल चव्हाण (वय २७), गुरूदेव हणमंत मद्रासी (२७), शुभम वासुदेव मद्रासी (२३), सुदर्शन नागराज मद्रासी (२६), भारत सुकांप्पा मद्रासी (२९), त्रिपाल पेदान्ना मद्रासी (२९), संजय राजू मद्रासी (२८), विनायक गणेश मद्रासी (२१, सर्व रा. मद्रासी कॉलनी, सांगली), अमित चंद्रकांत सरगर (२३, गणेशनगर, सांगली) अशी कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत.
डॉ. आंबेडकर रोडवरील लॉजमध्ये तीन पानी जुगार अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी छापा टाकण्यात आला. यात संशयित जुगार खेळताना आढळले. रोख पंधरा हजार ६१० रुपयांसह, सात मोबाईल, पत्त्याची पाने व जुगाराचे साहित्य असा ४६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.