निवास पवार ।शिरटे : लग्नसमारंभात गुंग असणाऱ्या आई-वडिलांची नजर चुकवून कृष्णा कालव्याकडे गेलेला त्यांचा सहावर्षीय मुलगा कालव्यामधील पाण्यात बुडून अघटित घडण्याची वेळ आली होती. मात्र त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील यांनी त्याला वाचवले.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील संदीप शिवाजी सावंत व सौ. माधुरी संदीप सावंत यांचा ऋग्वेद हा मुलगा. गुरुवारी दुपारी एका विवाहासाठी सावंत कुटुंबीय गेले होते. आई-वडील लग्नात व्यस्त असताना,ऋग्वेदने त्यांचा डोळा चुकवून कृष्णा कालव्याकडे धाव घेतली. तेथे काही मुले अंघोळ करीत होती. ऋग्वेद त्यांच्याकडे पाहत काठावर खेळत होता.
खेळता खेळता तोल जाऊन तो पाण्यात पडला. कालव्यातील पाण्याचा वेगही जास्त होता. तो पाण्यात पडल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्याचवेळी सरपंच गणेश हराळे, रावसाहेब पाटील, आनंदराव माळी, ग्रामविकास अधिकारी जयवंत थोरात, सचिन पाटील नूतन रस्त्याच्या कामाबाबत पाहणी करण्यासाठी तिकडे गेले होते.
ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वांनी कालव्याकडे धाव घेतली. पाण्यात बुडणाºया लहान मुलाला पाहून रावसाहेब पाटील यांनी पाण्यात उडी मारली. प्रवाहाचा अंदाज घेत पोहत जाऊन त्याला वाचवले. हळुहळू काठावर आणले. भेदरलेल्या व रडणाºया ऋग्वेदला शांत करुन त्यांनी धीर दिला.तोपर्यंत कालव्याच्या पाण्यात मुलगा पडल्याची बातमी वाºयासारखी गावात पसरली. बाया-बापड्यांचा लोंढा कालव्याकडे धावू लागला. त्यामध्ये ऋग्वेदचे आई-वडीलही होते. आपलाच मुलगा पाण्यात पडला होता हे कळाल्यावर, त्यांना भोवळ आली. इतरांनी त्यांना धीर दिला. मुलाला मरणाच्या दाढेतून वाचविलेल्या रावसाहेब पाटील यांचे उपस्थितांनी कौतुक केले.मोबाईल, पैशासह पाण्यात उडीभाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील यांनी प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न करता, अंगावरील कपडे, खिशातील महागडा मोबाईल, रोख पैसे याचा विचार न करता पाण्यात उडी मारली आणि ऋग्वेदला जीवदान दिले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील कालव्यामधून रावसाहेब पाटील यांनी सहावर्षीय ऋग्वेदला बुडता बुडता वाचविले व जीवदान दिले.