सांगली : ‘आयुष्यमान भारत’, ‘महात्मा फुले जनआरोग्य’ यासह केंद्र व राज्य शासनाच्या गोरगरीब रुग्णांसाठी अनेक मोफत योजना असून, रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार घेत असल्याच्या संशयावरून सांगली, मिरजेसह जिल्ह्यात २२ रुग्णालयांवर छापे टाकून तपासणी करण्यात आली. दिल्ली आणि मुंबईतील पथकाने संयुक्तपणे शनिवारी ही कारवाई केली. तपासणीचा अहवाल शासनाला सादर केला आहे.केंद्र आणि राज्य शासनाने अनुक्रमे ‘आयुष्यमान भारत’, ‘महात्मा फुले जनआरोग्य’ यासह आणखी काही योजना सुरू केल्या आहेत. योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर मोफत उपचार करणे सक्तीचे आहे. मोफत उपचार करण्यासाठी काही ठरावीक रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. उपचारानंतर संबंधित रुग्णाचा अहवाल सादर केल्यानंतर शासनाकडून संबंधित रुग्णालयास बिल मिळते. मात्र, बहुतांश रुग्णालयात वेगवेगळी कारणे दाखवून रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे गरिबांसाठी असलेल्या योजना चांगल्याप्रकारे राबविल्या जात नसल्याचे उघड झाले. या प्रकाराची केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली.शनिवारी आरोग्य विभागाची दहा पथके सांगलीत दाखल झाली. यामध्ये चाळीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. पथकाने स्थानिक आरोग्य विभागाला कोणतीही कल्पना न देता छापासत्र सुरू केले. पथकाने एकाचवेळी सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील २२ रुग्णालयांवर छापे टाकले. गेल्या सहा महिन्यांत शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. संबंधित रुग्णांशी संपर्क साधून ‘तुमच्याकडून उपचारासाठी पैशाची मागणी केली का’, ‘उपचार करण्यास टाळाटाळ केली का’, अशी विचारणाही केली. सायंकाळपर्यंत तपासणीचे काम सुरू होते. पथकाने शुक्रवारी कोल्हापुरातील ३४ रुग्णालयांवर छापे टाकले होते. तेथील कारवाईनंतर पथकाने सांगली व सातारा जिल्ह्यांत रुग्णालयांवर छापे टाकले.चौकशीबाबत गोपनीयताजिल्ह्यातील २२ रुग्णालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांत आक्षेपार्ह काही सापडले का नाही, याचा तपशील मिळू शकला नाही. पथकातील अधिकाºयांशी संपर्क साधला, पण त्यांनी हा चौकशी व तपासणीचा भाग आहे, शासनाला अहवाल सादर केला आहे, लवकरच पुढील कार्यवाही केल्याचे समजेल, असे सांगितले. योजनेच्या समन्वयकांशीही संपर्क साधला, पण त्यांचा मोबाईल बंद होता.
सांगली जिल्ह्यातील २२ रुग्णालयांवर दिल्ली, मुंबईतील पथकाचे छापे; मोफत योजनेत पैसे उकळल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:32 PM