सांगली : शहरातील विश्रामबाग, संजयनगर व अंकली येथील मटका अडड्यांवर पोलिसांनी कारवाई करीत सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह मटका साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील वडर काॅलनीत मटका अड्डा सुरू होता. त्यावर विश्रामबाग पोलिसांनी कारवाई केली. यावेळी विजय गुराप्पा वडर (वय ४५), महेश फकिरा कलकुटगी (३३), गणेश रामचंद्र वडर (३२), परशुराम वसंत धोत्रे (४५, सर्व रा. वडर गल्ली) या चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५७० रुपये रोख व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस शिपाई संदीप घस्ते यांनी फिर्याद दिली.
संजयनगर येथील आरटीओ कार्यालयाजवळील झाडाखाली मटका अड्डा सुरू होता. त्यावर संजयनगर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी इस्लामईल नजीर मुलाणी (वय ३२, रा. शेवाळे गल्ली, खणभाग) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३७० रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
अंकली येथे पोलिसांनी छापा टाकून सचिन रजनीकांत भाटे (४५, रा. कोल्हापूर रोड) याला मटका घेत असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४८२ रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.