मिरज : रिपाइं सांगली जिल्हा युवक आघाडीतर्फे रेल्वेस्थानकालगतच्या शहीद भगतसिंह झोपडपट्टी, चंदनवाडी झोपडपट्टी व हैदरखान विहीर झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी रेल्वेस्थानकासमोर उपोषण करण्यात आले. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई स्थगितीचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मिरजेत रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीतील घरे पाडणार असल्याच्या नोटीसचे फलक लावले आहेत. शहीद भगतसिंग झोपडपट्टी, चंदनवाडी झोपडपट्टी व हैदरखान विहीर झोपडपट्टीतील रहिवासी रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. झोपडपट्टीत आश्रय घेतलेल्या या गरिबांची घरे पाडण्याचा आदेश बेकायदा असून, पुनर्वसनाशिवाय घरे पाडू नयेत, अशी मागणी करीत रिपाइंतर्फे शहीद भगतसिंग झोपडपट्टी, चंदनवाडी झोपडपट्टी व हैदरखान विहीर झोपडपट्टी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मंगळवारी मिरज रेल्वेस्थानकासमोर रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह डॉ. रविकुमार गवई, मिरज शहर उपाध्यक्ष सुनील माने, सुरेश गाडे व सलिम लोंगे यांनी उपोषण सुरू केले.
उपोषणाची दखल घेत मध्य रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अशोक कांबळे यांनी तिन्ही झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन निर्णय होईपर्यंत आंदोलन स्थगित होणार नाही, असा पवित्रा घेतला. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई स्थगित केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी योगेंद्र कांबळे, अरुण आठवले, सतीश जाधव, श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडीच्या छाया सर्वदे, बापू सोनवणे, अविनाश कांबळे, मारुती धोतरे, युवक शहराध्यक्ष संदीप दरबारे, शानूर पानवाले, प्रमोद वायदंडे, हनमंत कांबळे, आकाश कांबळे, गौतम प्रज्ञासूर्य, संमेक कामत, कुपवाड शहराध्यक्ष संतोष सर्वदे, राम कांबळे, संजय कांबळे, मोजेस ॲंथोनी, त्रिदल वाघमारे, संतोष वाघेला, भीमराव नडोनी, शंकर बडची, जयवंत कांबळे, शिवाजी नडोनी यांच्यासह कार्यकर्ते व रहिवासी उपस्थित होते.