जत : जत शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. फळबागांना याचा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. ऐन हिवाळ्यात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही वेळ पाऊस झाला. हा पाऊस व ढगाळ वातावरण फळपिकासाठी हानिकारक असला तरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांसाठी उपयुक्त आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे फळपिकावर बुरी, बुरशी, मिलीबग रोगांचा प्रदुर्भाव होण्याची भीती आहे. तसेच तयार झालेल्या फळांना तडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फळपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.