मणेराजुरी (ता. तासगाव) येथे दिलीप शिरगावकर या शेतकऱ्याने वाया गेलेल्या द्राक्षबागेत टोमॅटोची शेती फुलविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील दिलीप शिरगावकर यांच्या द्राक्ष बागेला सलग तिसऱ्या वर्षी पावसाने दणका दिला. दीड एकरमधील घड पावसाने कुजले. शिरगावकरांनी हार मानली नाही. जिद्द कायम राखत त्याच बागेच्या मांडवावर त्यांनी टोमॅटोची शेती फुलविली.
टोमॅटोच्या उत्पन्नातून किमान बागेचा देखभाल खर्च काढण्याची त्यांची जिद्द आहे. तीन एकर बागेत सुपर सोनाक्का द्राक्षांचे उत्पादन ते घेतात. गेल्या पावसाळ्यात पावसाने दणका दिला. छाटणी केलेली दीड एकर बाग कुजली. बाग सोडून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उशिरा छाटणी केलेल्या उर्वरित दीड एकर बागेवर भरवसा ठेवला. घड कुजलेली दीड एकर बाग तशीच सोडून देण्याऐवजी काहीतरी उत्पन्न घेण्याचा विचार केला. त्यातूनच टोमॅटोची कल्पना सुचली.
बागेचाच मांडव त्यासाठी वापरला. सप्टेंबरमध्ये लागवड केली. १५ डिसेंबरपासून माल मिळायला लागला. द्राक्षबागेत रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी दुसरे आंतरपीक घेण्यास शेतकरी धजावत नाहीत; पण शिरगावकरांनी टोमॅटो यशस्वी केल्याने हा कुतूहलाचा विषय ठरला. पावसाने बागा गेलेल्या अन्य सहा-सात शेतकऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले. अर्थात शिरगावकरांच्या टोमॅटोला अद्याप चांगला दर मिळालेला नाही.
चौकट
कोलकात्याला निर्यात
शिरगावकरांनी टोमॅटो कोलकात्याच्या बाजारपेठेत पाठविले. तेथे दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सांगलीत मात्र पाच रुपयांपर्यंत दर मिळाला. टोमॅटोसाठी बागेचाच मंडप, तारा, ठिबक वापरल्याने लागवडीवर फारसा खर्च झाला नाही.