लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : वारणा (चांदोली) धरण परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात तीन हजार ९४७ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तसेच धरणातून एक हजार ५१५ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली हा पावसाचे आगार समजले जाते. या परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर धूळवाफेवर भात पेरण्या झाल्या आहेत. पुन्हा पावसाने आठ दिवस विश्रांती घेतली आणि दोन दिवसांपासून पावसाने कमी अधिक प्रमाणात सुरुवात केली. मंगळवारी मध्यरात्रीपासून दमदार पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सकाळी थोडी उघडीप दिली. पण दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर वाढवला. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढू लागली आहे. गेल्या २४ तासात २२ मिलीमीटर पावसासह एकूण ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणी पातळी ६०१.३० मीटर असून पाणीसाठा १३.६१ टीएमसी आहे.