: गव्हाण (ता. तासगाव) परिसरात रविवार, ११ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे गारवा मिळाला. रविवारी दुपारी उकाड्यासह वातावरण तप्त झाले होते. सायंकाळ होताच एकाएकी ढग दाटून येत वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
सध्या परिसरात गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची बऱ्यापैकी काढणी व मळणी झालेली आहे. तसेच द्राक्षबागांची एप्रिल छाटणी सुरू आहे. द्राक्षबागेला पाण्याची गरज असताना पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अंतिम टप्प्यात काढणीस आलेली द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.