सांगली : चांदोली (वारणा) धरणक्षेत्रात ३३ मिलिमीटर, तर कोयना धरणक्षेत्रात सर्वाधिक ७७ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या दोन धरणात दोन दिवसात दोन टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे़ शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या़ कृष्णा नदीची सांगलीत आयर्विन पूल येथील पाणीपातळी दिवसात दोन फुटाने वाढून सात फूट झाली आहे़चांदोली धरणक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे़ त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे़ काल चांदोली धरणात ११़४० टीएमसी पाणीसाठा होता़ यामध्ये १़६९ टीएमसीने वाढ होऊन मंगळवारी १३़०९ टीएमसी पाणीसाठा झाला होता़ कोयना धरणक्षेत्रातही ७७ मि.मी़ पाऊस झाला असून, धरणात १५़०२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे़ धरणांतील पाणीसाठा वाढत असल्यामुळे शहरासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे़ धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे़ पुणे हवामान खात्याने येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे़चरण : शिराळा पश्चिम भागात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वहात आहेत. वारणा नदीच्या पात्रात पावसाच्या पाण्यामुळे हळूहळू वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात चांदोली धरणक्षेत्रात ३३ मिलिमीटर, तर शिराळा तालुक्यात २० मिलिमीटर पाऊस झाला आहे़ मिरज तालुक्यातही मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरु होता़ १३ मिलिमीटर पाऊस झाला असून रात्री पावसाचा जोर वाढल्याने वातावरणात गारवा होता़ लिंगनूर : मिरज पूर्व भागात आरग, लिंगनूर, जानराववाडी, खटाव येथे सायंकाळी मान्सूनच्या सरी कोसळल्या. पाऊण तास सर्वच गावांत मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या. शाळगाव : कडेगाव तालुक्यातील शाळगावसह तालुक्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केली आहे. काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे खरीप पिकांना कमी-अधिक प्रमाणात जीवदान मिळाले आहे. शेतकरी वर्ग सुखावला आहे. तालुक्यात ६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तासगाव : तासगाव तालुक्यात रविवारी रात्री ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज सकाळी किरकोळ पाऊस बरसला. दिवसभर पावसाची उघडीप होती. मात्र ढगाळ वातावरण कायम होते.दुष्काळी जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
By admin | Published: July 15, 2014 11:55 PM