सांगली : जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असून, बुधवारी दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. गुरुवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत सरासरी २.७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, जत तालुक्यात ११.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात २.४, खानापूर-विटा येथे ०.६, वाळवा-इस्लामपूरला १.८, तासगावला ०.९, शिराळा तालुक्यात १.५, आटपाडीत ०.३, कवठेमहांकाळला ०.३, पलूसला २.८ मि. मी. पाऊस झाला.
बुधवारी दुपारी दोन वाजता शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ढगांची दाटी कायम होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी दिवसभरही जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.