सांगली : जिल्ह्यात मंगळवारी पाऊस थांबल्यामुळे अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग ५० टक्क्यांनी कमी करून ७५ हजार क्युसेक केला आहे. धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्रात परतले. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी १३ फूट झाली.चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून १८३५ क्युसेकने विद्युतगृहातून विसर्ग सुरू आहे. सध्या २५.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १७ मिलिमीटर पाऊस झाला. सध्या धरणाचा पाणीसाठा ५९.६२ टीएमसी झाला आहे. २१०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नवजा येथे ६७, तर महाबळेश्वरमध्ये ४२ मिलिमीटर पाऊस झाला.अलमट्टी धरणात एक लाख ३६ हजार क्युसेकने आवक होत असून, ७५ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. धरणाच्या पाणीसाठ्याची क्षमता १२३ टीएमसी असून, सध्या ८७.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पाणीपातळीही कमी होऊ लागली असून, वारणा नदीचे पाणी पात्रात परतले. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी १३ फूट झाली.
पाऊस थांबला, अलमट्टीतून विसर्ग ५० टक्क्यांनी केला कमी; दीड लाख क्युसेकने सुरू होता पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 4:37 PM