सांगली : पावसाळा सुरू होण्याअगोदर ग्रामीण भागात घरांची दुरुस्ती प्राधान्याने केली जाते. मात्र, यंदा अगदी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने पुन्हा एकदा घरांची दुरुस्ती करण्यात येत आहे.
----
रस्त्यांवर फांद्यांची अडचण
सांगली : रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्या खाली आल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांगली-मिरज मार्गावर मार्केट यार्डजवळ अशा फांद्या आहेत. एका बाजूने जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास होतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या फांद्या थेट लागून इजा होत आहे. त्यामुळे रस्त्यावर खाली आलेल्या फांद्या तोडण्याची मागणी होत आहे.
------
वीज उपकरणांचा वापर करताना सावधानता बाळगा
सांगली : पावसामुळे अनेक विद्युत उपकरणे भिजलेली असतात. विशेषत: शेतातील विद्युत मोटारी भिजलेल्या असतात. अशावेळी अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. हातात काठी घेऊन अथवा इतर साधनांच्या आधारे पूर्ण खात्री करूनच प्रवाह तपासणी करून मग या उपकरणांना हात लावावा व त्याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
शाळा बंद असल्याने रिक्षाचालक अडचणीत
सांगली : कोरोनामुळे अगोदरच व्यवसाय कमी झाला असताना, शाळाही अद्याप बंद असल्याने रिक्षाचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने रिक्षाचालकांना काही प्रमाणात आर्थिक मदत केली असली तरी व रेशनवर धान्याची सोय केली असली तरी व्यवसाय नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शाळांना विद्यार्थी सोडण्यासाठी कार्यरत असलेल्या रिक्षाचालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-----
सांगलीतून मोबाइल लंपास
सांगली : शहरातील शिवाजी मंडई परिसरातून २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञाताने लंपास केला. याप्रकरणी जालिंदर बापू यादव (रा. खणभाग, सांगली) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास यादव यांनी खिशात ठेवलेला मोबाइल चोरट्यांनी लांबविला.