आष्टा : आष्टा शहर व परिसरात वादळी वाऱ्यामुळे दिवसभर जोरदार पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाेते.
आष्टा परिसरात सकाळपासूनच वादळी वारे वाहत हाेते. थंडगार हवा व वादळी वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सकाळी दहानंतर पावसाला सुरुवात झाली. दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री नऊच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतली. कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. आष्टा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडत आहेत. दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले. आष्टासह कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी या परिसरात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाळा सुरू होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी असतानाच वादळी वाऱ्यामुळे पाऊस पडत आहे. यामुळे दिवसभर पावसाळा सुरू झाल्यासारखे चित्र हाेते.