अंजर अथणीकर - सांगली -गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाची सुमारे ६२ टक्के पेरणी झाली असताना, ऐन पावसाळ्यात मात्र सोळा पाणी टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने डिसेंबर ते मेअखेर पाच वेळा अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मान्सूनला सुरुवात होऊन आता वीस दिवसांचा कालावधी उलटला. पहिला आठवडा वगळता पावसाने तशी पाठच फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे शेतकरी हबकला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. २५ जूनअखेर जिल्ह्यात ४९ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये मिरज तालुक्यात १९ हजार ९७० हेक्टरवर, जत तालुक्यात ६ हजार ६९५ हेक्टरवर, खानापूर तालुक्यात १३ हेक्टरवर, वाळवा तालुक्यात ३ हजार १८२ हेक्टरवर, तासगाव तालुक्यात १५० हेक्टरवर, शिराळा तालुक्यात १४ हजार ६७० हेक्टरवर, कवठेमहांकाळ तालुक्यात २ हजार ७०१ हेक्टरवर, पलूस तालुक्यात २ हजार ८० हेक्टरवर आणि कडेगाव तालुक्यात २ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात मेअखेर एकही टँकर सुरु नसताना, आता मात्र सोळा टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जत, तासगाव, खानापूर व शिराळा तालुक्यातील १४ गावांमध्ये सुमारे ४७ हजार लोकांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी चौदा विहिरींचे आता अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षापेक्षा पाऊस आणि पाणीसाठा अधिक गतवर्षी जूनमध्ये पाऊस पूर्णपणे गायब होता. जुलैमध्ये गतवर्षी पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १५२ टक्के इतका पाऊस झाला आहे. जत वगळता सर्वच तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झाला आहे. वारणा धरणात सध्या २३.५४ टीएमसी (६८.४२ टक्के) पाणीसाठा आहे. त्याचबरोबर कोयना धरणात सध्या ५०.५१ टीएमसी (४८ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी जूनअखेर वारणा धरणात १२.०२ टीएमसी (३४ टक्के), तर कोयना धरणात १३.९७ टीएमसी (१४ टक्के) पाणीसाठा होता.गेल्या आठ दिवसात तसा पाऊस गायब आहे. काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या आहेत. आगामी आठ दिवसात हलक्या पावसाच्या सरी वर्तवण्यात आल्या आहेत. सध्या पावसाची गरज आहे. जिल्ह्यात सुमारे ६२ टक्के पेरण्या झाल्या असून, आगामी आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर समस्या निर्माण होणार आहेत.- शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, सांगली.
पावसाची ओढ... चिंतेचे ढग...
By admin | Published: June 30, 2015 11:17 PM