लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या चोवीस तासात सरासरी १३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस कवठेमहांकाळ तालुक्यात ३०.४ मिलिमीटर नोंदविला गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगांची दाटी वाढली आहे. मंगळवारी दुपारी व सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा हजेरी लावली. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. सांगली, मिरज शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. उपनगरांमध्ये ड्रेनेजसाठी खोदाई केल्याने मातीने भरलेल्या रस्त्यांवर दलदल निर्माण झाली. गुंठेवारी भागातही दलदल निर्माण झाली आहे.
शहरात स्टेशन चौक, छत्रपती शिवाजी स्टेडियम, शिवाजी मंडई, बसस्थानक परिसरात पाणी साचून राहिले होते. जिल्ह्यात अन्य भागातही पावसाने हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या १८ जूनपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. त्यानंतर १९ ते २१ जून या कालावधीत पावसाचा जोर ओसरणार आहे. या काळात कमाल व किमान तापमान स्थिर राहणार आहे. जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान ३० तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान अद्याप जास्त आहे. आठवडाभर ते २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची शक्यता आहे.
चौकट
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस (बुधवारी सकाळपर्यंत)
तालुका पाऊस आजअखेर एकूण
मिरज २२.४ ९७.२
जत ४.९ १०७.१
खानापूर-विटा १४.७ ३४.१
वाळवा-इस्लामपूर ११.८ ५७.९
तासगाव १४ ८४.७
शिराळा ११.९ ९३.६
आटपाडी ३.९ ५७.२
कवठेमहांकाळ ३०.४ ८०.७
पलूस १०.७ ९१.६
कडेगाव १०.९ ६५.८