लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दोन दिवसापासून कायम असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत पाणी पात्राबाहेर येत पूरस्थिती निर्माण झाल्याने स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली, भिलवडी परिसरात पाहणी करीत प्रशासनाला सूचना दिल्या. तर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीही नदीकाठावर भेट देत सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
गुरुवारी रात्रीपासून पाणीपातळी वाढतच चालल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोयना, वारणा धरणातील विसर्ग व त्यामुळे नदीतील पाणीपातळीतील वाढ यावर लक्ष देत नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी यंत्रणा रात्रीच कार्यन्वित झाली होती. शुक्रवारी दिवसभरही पाऊस कायम असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील व पाणीपातळीत सरासरी १२ फुटापर्यंत वाढ अपेक्षित धरून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली शहरातील पुराचे पाणी आलेल्या भागातील पाहणी करीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी भिलवडी येथेही भेट देत पाहणी केली. पाणी शिरल्याने शाळेत राहण्याची सोय केलेल्या ग्रामस्थांची त्यांनी विचारपूस करीत सोयी पुरविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी नदीकाठावर भेट देऊन सुरक्षा उपायांची पाहणी केली. पूर पाहण्यासाठी पुलावर होत असलेली नागरिकांची गर्दी कमी करीत, कुणीही नदीत पोहण्यासाठी उतरू नये, याबाबत त्यांनी पोलिसांना सूचना देत या भागातील बंदोबस्तही वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.