खानापूर : खानापूर घाटमाथ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी टेंभू योजनेचा लाभ लवकर मिळणे गरजेचे आहे. यासाठी चौथा, पाचवा टप्पा त्वरित कार्यान्वित झाला पाहिजे. आमदार अनिल बाबर यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु वेळ पडली तर लोकचळवळ उभारून आमदारांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन्. डी. पाटील यांनी करंजे (ता. खानापूर) येथे केले. करंजे (ता. खानापूर) येथील भीमरावतात्या सूर्यवंशी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व संगणकीय प्रणालीचा प्रारंभ प्रा. डॉ. पाटील यांच्याहस्ते झाला, याप्रसंगी ते बोलत होते. आ. गणपतराव देशमुख, आ. मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष गजानन शेटे उपस्थित होते. प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, सध्या सहकार मोडीत निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्तच होत चालला आहे. सहकार जिवंत राहणे गरजेचे आहे. तरच शेती आणि शेतकरी वाचणार आहे. आ. कदम म्हणाले, घाटमाथ्याचा पाणीप्रश्न लवकर सुटला पाहिजे. तरच येथील शेतकरी, जनता सुखी होणार आहे. टेंभूसाठी आम्ही सर्वजण पक्षविरहित काम करत आहोत. आ. बाबर म्हणाले की, खानापूर घाटमाथ्याचा यावर्षीचा दुष्काळ शेवटचाच ठरणार आहे. त्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. भीमराव तात्या पतसंस्थेकडे तात्यांच्या विचारांचे स्मारक म्हणूनच पाहिले जाईल. याप्रसंगी बाजार समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, राजेश कदम, सुभाष पाटील, प्राचार्य सुरेश साळुंखे, प्रा. बाबूराव लगारे, सारिका माने, राजेंद्र शिंदे, सदाशिव हसबे, राजाभाऊ शिंदे, गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, उत्तमराव सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, सुभाष गायकवाड, संभाजी जाधव, संभाजी जाधव, गजानन शेटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
‘टेंभू’च्या टप्प्यासाठी चळवळ उभारा
By admin | Published: May 03, 2017 11:26 PM