सांगली : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी महिन्याभरात बुथ कमिट्या स्थापन कराव्यात, अशी सूचना करीत, या निवडणुकीत तरुणांना जास्तीत जास्त उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह कोते पाटील यांनी मंगळवारी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर व ग्रामीण कार्यकर्त्यांची स्वतंत्र आढावा बैठक सांगलीत झाली, यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पुणे नगरपालिकेच्या नगरसेविका शिल्पा भोसले, जि. प. गटनेते शरद लाड, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार उपस्थित होते.कोते पाटील म्हणाले, राज्य सरकारने केलेली ३६ हजार नोकर भरतीची घोषणा फसवी आहे.
या नोकऱ्या केवळ पाच वर्षांसाठी आहेत. बेरोजगारांना काम मिळत नाही, बहुजनांना शिक्षण मिळत नाही, सुशिक्षितांना नोकºया नाहीत. महिलाही आज सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांच्याच शेळ्या चोरीला जात असतील, तर सामान्यांची काय अवस्था असेल, याचा विचार करा. धनगर, मराठा, लिंगायत या सर्व समाजाची फसवणूक केली आहे. शासनाच्या विरोधात आता संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल. आम्हाला धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले म्हणून काम थांबणार नाही, माघार घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक बुथ १५ युथ अशी संकल्पना मांडली आहे. संख्येपेक्षा पक्षासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते हवेत. सांगली महापालिकेसाठी २० प्रभाग असून तिथे ४० कमिट्या स्थापन कराव्यात. प्रभागात साधारण १५ बुथ असतील. त्यावर पंधरा कार्यकर्ते नियुक्त करा. केवळ रिकाम्या जागा भरण्याचे काम करू नये, असा चिमटाही त्यांनी काढला.स्वागत व प्रास्ताविक राहुल पवार व भरत देशमुख यांनी केले. नगरसेविका शिल्पा भोसले यांनी यावेळी, बुथ कमिटीची संकल्पना काय आहे, तिची बांधणी कशी असावी, बुथ कमिटीच्या कार्यकर्त्यांची कामे व जबाबदारी काय, हे सांगितले. बुथमधील प्रत्येक कुटुंबापर्यंत बुथचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे, असे सांगितले.यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, महिला अध्यक्षा विनया पाठक, हरिदास पाटील आदी उपस्थित होते.बुथ सक्षम करा : जयंत पाटीलडेक्कन सभागृहातील बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उपस्थिती लावली. ते म्हणाले की, बुथ कमिट्या समक्ष करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. या कमिट्यांमार्फत राष्ट्रवादीचा अजेंडा घरा-घरापर्यंत पोहोचविता येईल. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यकर्ते काम करतील, असे सांगितले.
भाजपकडून धमक्याभाजप सरकारचे धोरण व घोषणा फसव्या आहेत. त्याविरोधात आंदोलन सुरू केले तर, पोलीस आयुक्त, अधिकारी व प्रशासनाकडून आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत. पोलीस अधिकारी, कलेक्टर व अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप कोते-पाटील यांनी केला.