महेंद्र किणीकरवाळवा : सध्या वातावरणात प्रचंड उष्मा वाढला आहे. दिवसभर माणसाच्या अंगाची लाही लाही होत आहे, पण पशु-पक्ष्यांनी त्यांची व्यथा कुणाला सांगायची. याची जाणीव ठेवत, मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पाणी पाजून मानवधर्म जपण्याचे काम वाळव्याचे राज इनामदार करत आहेत.पेठभाग वाळवा येथील सोयाबीनचे व्यापारी राज इनामदार सदैव प्रत्येकाच्या मदतीला हजर असतात. रस्त्यावर म्हातारी माणसे दिसली, शाळकरी मुले शाळेत जायला उशीर झाला, म्हणून धावाधाव करताना त्यांनी पाहिले की, त्यांना हमखास आपल्या गाडीवरून सोडून येतात.
कोणी आजारी असेल व वाटेत बसलेले दिसले की, आपल्या गाडीवरून आपला व्यवसाय टाकून हमखास सोडून येणारे, असे हे व्यक्तिमत्त्व आहे. कुणी दुकानचा माल खरेदी केला आणि ओझे जात नसेल, तर राज इनामदार घरपोच मोफत सेवा देणार, असा हा व्यावसायिक आहे.सध्या उन्हामुळे त्रस्त मोकाट जनावरेही त्यांच्या नजरेतून चुकली नाहीत. वाळव्यात मोकाट जनावरांची संख्या मोठी आहे. मोकाट गाढवे तर सैरभैर फिरत असतात,पणयांची तृष्णा माणुसकीचा झरा असणारे राज इनामदार भागवत आहेत.
पेठभाग येथे मध्य वस्तीत राजारामबापू इंडोमेंटच्या वतीने कूपनलिका सुरू केली आहे. या ठिकाणी ते स्वतः कूपनलिकेला बादली लावून पाणी उपसा करून, येईल त्या जनावरांची तहान भागवितात. पक्ष्यांकरिता पाणी बकेट ठेवली आहेत. धान्य खाऊ घालतात. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.