मिरज : कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणी टंचाईमुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने वारणा व दूधगंगा धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पाण्यासाठी कर्नाटकातील ग्रामस्थांचा हल्ला होऊ नये, यासाठी राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या हालचाली सुरु आहेत.शिरोळजवळ राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा व दूधगंगा धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र या मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणी टंचाईमुळे २००३ व २००४ मध्ये अथणी तालुक्यातील ग्रामस्थांनी राजापूर बंधाऱ्यावर हल्ला करुन जेसीबीने बरगे उपसले होते. त्यावेळी स्थानिक व कर्नाटकातील ग्रामस्थांत धुमश्चक्री झाली होती. याप्रकरणी कर्नाटकातील ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करुन राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजापूर बंधाऱ्यात सध्या पाव टीएमसी पाणी असून पाणी सोडण्यासाठी कर्नाटकातील ग्रामस्थांकडून दबाव आहे. कर्नाटकात पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने राजापूर बंधाऱ्यावर हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली. दूधगंगा नदीवर धरण बांधताना झालेल्या कराराप्रमाणे कर्नाटकाला उन्हाळ्यात चार टीएमसी पाणी द्यावयाचे आहे. कर्नाटकाला आतापर्यंत दोन टीएमसी पाणी सोडले असून पाणीटंचाईमुळे आणखी चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी आहे. (वार्ताहर) पाण्याविना सीमाभागातील नळपाणी योजना बंद कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणीटंचाई आहे. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावात नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. या गावांत विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर सुरू आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळीही खालावत असून पाणी टंचाईने त्रस्त सीमाभागातील ग्रामस्थ महाराष्ट्रातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत.
राजापूर बंधाऱ्याला संरक्षण मिळणार
By admin | Published: March 16, 2016 8:28 AM