लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांगलीतील काही व्यापाऱ्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांची खाती राजारामबापू बँकेमध्ये आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांचे खाते उतारे, केवायसी आणि व्यवसायासंदर्भातील कागदपत्रांची माहिती घेतली आहे. गेल्या ४२ वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करत पारदर्शी कारभार करणाऱ्या राजारामबापू बँकेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बाबर यांनी शनिवारी सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगली येथील व्यापाऱ्यांवर छापे टाकल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यातच ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजारामबापू पाटील सहकारी बँकेकडे मोर्चा वळवल्याने खळबळ उडाली होती. ही बँक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्याने त्याची मोठी चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर बाबर म्हणाले, सांगली येथील व्यापाऱ्यांच्या खात्यावर झालेल्या व्यवहारांची व्हॅट संदर्भात १० वर्षांपूर्वी चौकशी झाली होती. या चौकशीत काहीही निष्पन्न झालेले नसताना पुन्हा १० वर्षांनंतर ईडीने छापे टाकले आहेत. या व्यापाऱ्यांची खाती आमच्या बँकेत असल्याने ईडीचे काही अधिकारी आमच्याकडे आले होते. बँक व्यवहारात कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार नाही.
बाबर म्हणाले, बँक नियमानुसार काम करत आहे. गेल्या ४२ वर्षांत बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून प्रत्येक वर्षी बँकेचे ऑडिट व तपासणी होत असते. त्यामुळे बँकेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता नसल्याचे स्पष्ट होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेत येऊन संबंधित व्यापाऱ्यांचे खाते उतारे, केवायसी आणि त्यांच्या व्यवसायासंदर्भातील कागदपत्रांची माहिती घेतली आहे. त्यांच्याकडून इतर कोणतीही माहिती मागण्यात आलेली नाही.
कायदेतज्ज्ञांशी चर्चा
सांगलीतील व्यापाऱ्यांवर ईडीने टाकलेल्या छाप्यांचा संदर्भ घेत ज्या माध्यमांनी राजारामबापू बँकेची बदनामी करण्याच्या उद्देशाने ज्या बातम्या आणि माहिती प्रसारित केली आहे, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बँक प्रशासन कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बाबर यांनी स्पष्ट केले.