इस्लामपूर : राजारामबापू सहकारी दूध संघाने दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या म्हैस दुधासाठी २ रुपयांची तर गाय दुधासाठी ३ रुपयांची खरेदी दरात वाढ केल्याची घोषणा अध्यक्ष नेताजीराव पाटील आणि उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केली. ही दरवाढ काल, शुक्रवारपासून (दि.२१) लागू झाली.दूध संघाच्या कुसूमताई पाटील सभागृहात या दूध दरवाढीची माहिती दिली. म्हैशीच्या १० फॅट दुधास ८५ रुपये तर गायीच्या ३.५ फॅट दुधास प्रतिलीटर ३५ रुपये दिले जाणार आहेत. नेताजीराव पाटील म्हणाले, म्हैस दुधासाठी ६.५ फॅट व ९ एसएनएफ गुणप्रतिस प्रतिलीटर ४९ रुपये असा दर राहील. गाय दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला ३५ रुपये प्रतिलीटर असा खरेदी दर दिला जाणार आहे. यापूर्वीच म्हैस दुधास २ रुपये २० पैसे तर गाय दुधास १ रुपयांचा प्रतिलीटर दूध दर फरक विनाकपात देण्यात आला आहे.ते म्हणाले, माजी मंत्री आ. जयंत पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघामार्फत दूध उत्पादकांना अनेकविध सुविधा, पशुवैद्यकीय सेवा, अनुदान अशा पद्धतीने मदत केली जाते. या सर्व सुविधांवर प्रतिलीटर होणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास म्हैस दुधास ५१ रुपये ७३ पैसे तर गाय दुधास ३६ रुपये ५३ पैसे इतका दर दिला जाणार आहे.शशिकांत पाटील म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी परराज्यातील संघांचा दराचा भपका समजून घ्यावा. त्यांच्याकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच दूध कधी नाकारतील याची शाश्वती नाही, हे समजून घेऊन दूध उत्पादकांनी राजारामबापू दूध संघाकडे आपले दूध देऊन प्रगती साधावी.यावेळी संचालक बाळासाहेब पाटील, संग्राम फडतरे, बबनराव सावंत, अनिल खरात, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी, संकलन अधिकारी आर. एस. पाटील, कार्यालयीन अधीक्षक लालासाहेब साळुंखे उपस्थित होते.
राजारामबापू संघाची दूध खरेदी दरात वाढ, जाणून घ्या नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:33 PM