सांगली : जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये व मुद्रांक विक्रेत्यांकडून सुुरू असलेली नागरिकांची लूट थांबविण्याची मागणी वडार समाज संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. महिन्याभरापासून मुद्रांकांची तस्करी सुरू असल्याने नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याची तक्रार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दानोळे यांनी निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, सांगली, मिरज, कुपवाड शहरांत मुद्रांक विक्रेत्यांकडून लूट केली जात आहे. प्रत्येक मुद्रांकासाठी वीस ते तीस रुपये जादा घेतले जात आहेत. दस्त करताना संगणकीय टायपिंगसाठी मनमानी रक्कम आकारली जाते. अनावश्यक कागदपत्रे मागून अडवणूक केली जाते. कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणीच्या नावाखाली आणखी पैसे मागितले जातात.
निवेदनात म्हटले आहे की, दुय्यम निबंधक कार्यालयातही भ्रष्टाचाराचा कहर सुरू आहे. कर्मचारी सहकार्य करत नाहीत. कार्यालयात तसेच मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानात लिहिणावळीचे दर दर्शनी भागात लावलेले नाहीत. दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. दरपत्रकाअभावी नागरिकांची राजरोस फसवणूक होते. त्यांच्यावर दुय्यम निबंधकांचे नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी.
चौकट
साहेबांना पैसे द्यावे लागतात
निवेदनात म्हटले आहे की, साहेबांना पैसे द्यावे लागतात, असे सांगत मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक अवाजवी वसुली करतात. दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाला असून, साहेबांसाठी पैसे गोळा करण्याचे काम ते करत आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाविना हे चालत नाही, हे निश्चित आहे.
चौकट
दाखला नसल्यास वीस हजार रुपये द्या
दस्त नोंदणीवेळी जागा असल्याचा दाखला मागितला जातो. तो नसल्यास प्रतिगुंठा पंधरा ते वीस हजार रुपये जादा मागितले जातात. खरेदीपत्र करतानाही शासकीय रकमेपेक्षा २५ ते ३० हजार रुपये जादा घेतले जातात. नोटरी व कब्जेपट्टी करताना प्रत्येक दस्ताला हजार ते दीड हजार रुपये जादा घेतले जातात.
-------