प्रताप महाडिक ।कडेगाव : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट बुधवारी पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी सोनहिरा कारखान्यावरील हेलिपॅडपासून नेवरी येथील सभास्थळापर्यंत विश्वजित यांच्या मोटारीचे सारथ्य केले. यामुळे विश्वजित यांच्यासाठी राजस्थानचे उपमुख्यमंत्री ‘पायलट’ बनल्याची चर्चा मतदारसंघात रंगली.
राजस्थानात सत्तापरिवर्तनात मोलाचा वाटा उचललेले सचिन पायलट यांची तोफ आता महाराष्ट्राच्या विधानसभा प्रचारातही धडाडत आहे. महाराष्ट्रात पहिली सभा त्यांनी मित्र विश्वजित यांच्यासाठी घेण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी ते हेलिकॉप्टरने सोनहिरा कारखाना येथील हेलिपॅडवर उतरले. २०१४ च्या निवडणुकीतही वांगी येथे सचिन पायलट यांची प्रचार सभा झाली होती. सचिन पायलट व विश्वजित यांच्या मैत्रीची साक्ष देणारे आणि कदम कुटुंबीयांच्याप्रति जिव्हाळ्याचे भाषण कार्यकर्त्यांसाठी आकर्षण असते. यामुळे दोन तास उशीर झाला तरी, सभास्थळी बसलेले कार्यकर्ते हलले नव्हते. सभेला उशीर होणे सचिन पायलट यांना योग्य वाटत नव्हते. परंतु नाईलाज होता. हेलिपॅडवर उतरल्यावर आमदार मोहनराव कदम व विश्वजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी पायलट यांचे स्वागत केले. यावेळी सभास्थळी जाण्यासाठी गाड्यांचा ताफा सज्ज होता. पायलट यांनी लगबगीने पुढे जात विश्वजित यांच्या मोटारीच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. बाजूला विश्वजित बसले.
प्रारंभी डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि पुढे भरधाव वेगाने ताफा नेवरीकडे रवाना झाला. काही वेळात गाड्या सभास्थळी पोहोचल्या. यावेळी खुद्द सचिन पायलट गाडी चालवत आहेत आणि विश्वजित कदम बाजूला बसले आहेत हे पाहून कार्यकर्त्यांनाही आश्चर्य वाटले.
साहेबांच्या आठवणींना उजाळासचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांची आणि विश्वजित कदम यांचे वडील पतंगराव कदम यांची मैत्री सर्वश्रुत होती. मोटारीत बसल्यावर सचिन पायलट यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांच्या मैत्रीची परंपरा जपणाऱ्या या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सभास्थळ गाठले.