इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील राजश्री जाधव-पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद द्विगुणीत करताना १८ तासांच्या खडतर प्रवासानंतर दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर मानल्या गेलेल्या किलिमांजारोवर भारतीय ध्वज फडकावला.अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी त्यांनी चढाईला सुरुवात केली. १८ तासांनंतर पाच हजार ८९५ मीटर उंचीवर असलेल्या शिखरावर १५ ऑगस्टच्या सकाळी भारताचा तिरंगा फडकावला. याचवेळी त्यांनी जगाला सूर्य नमस्काराचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक सूर्य नमस्कार घातला.राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील या दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात नियंत्रक म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र वित्त व लेखासेवा या मूळ विभागात त्या सेवेत आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दापोलीच्या कृषी विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर आल्या आहेत. या विद्यापीठाचेसुद्धा सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे.त्यांनी अटलबिहारी वाजपेयी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमधून गिरिभ्रमणाचे प्रशिक्षण घेतले आहे. राज्यातील सर्वोच्च असणारे कळसूबाई शिखर त्यांनी ५ वेळा सर केले आहे. प्रशासनातील अनेक महिला अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी गिरिभ्रमणाच्या मोहिमा पूर्ण केल्या आहेत. लिंगाना या चढाईसाठी कठीण समजला जाणारा किल्लाही त्यांनी सर केला आहे. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात रायगड प्रदक्षिणा, पन्हाळा-पावणखिंड-विशाळगड असे सलग गिरिभ्रमणही त्यांनी केले आहे. प्रतापगड, राजगड, तोरणा हे गडकिल्ले अनेकवेळा सर केले आहेत.त्यांच्या या गिरिभ्रमणाच्या मोहिमेला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संदीप सावंत, राजश्री शाहू अकॅडमीचे डॉ. विक्रांत पाटील, संदीप नाझरे, वैभव राजे-घाडगे आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले आहे.
कापूसखेडच्या राजश्रीची ‘किलिमांजारो’वर धडक; अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी फडकाविला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 1:02 PM