सांगली : राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू गवळी यांचा जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र शनिवारी विभागीय जात पडताळणी समितीने रद्द ठरविले. यासंदर्भातील आदेश आयुक्तांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे गवळी यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. याबाबत येत्या सोमवारी आयुक्तांकडून गवळी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३२ मधून गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे अलताफ शिकलगार यांनी निवडणूक लढविली होती. यामध्ये गवळी यांचा विजय झाला होता. गवळी यांनी उमेदवारी अर्ज भरताना गवळी जातीचा दाखला जोडला होता. ५ जून २०१३ रोजी विभागीय जात पडताळणी समितीकडून गवळी जातीचा दाखला वैध ठरवून वैधता प्रमाणपत्रही गवळी यांनी मिळविले होते. या दाखल्यासाठी गवळी यांनी बनावट कागदपत्रे जोडली होती. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी अलताफ शिकलगार यांनी २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात केली होती. गवळी यांनी सादर केलेल्या त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा अशी जात होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने गवळी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करुन हे प्रकरण फेर निर्णयासाठी समितीकडे पाठविले होते. या समितीने फेरतपासणी केली. यात गवळी यांच्या जात पडताळणी दाखल्यासाठी दिलेली वंशावळ तपासण्यात आली. पांडुरंग गवळी हे राजू गवळी यांचे चुलत भाऊ नसून, दुसरेच कोणी तरी असल्याचे आढळून आले. गवळी यांनी सादर केलेल्या वंशावळ प्रतिज्ञापत्रात त्यांचा सख्खा भाऊ गजानन गवळी यांचे नाव दिले आहे. ही व्यक्ती मोठा भाऊ आहे, म्हणून जात प्रमाणपत्र मिळविले होते. मात्र, गजानन गवळी यांची चौकशी केल्यानंतर त्यांचा व राजू गवळी यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गवळी यांनी सादर केलेल्या कागदोपत्री पुराव्यात २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचा गवळी जातीचा नोंद असलेला रक्तातील नातेवाइकाचा एकही पुरावा आढळून आला नाही. यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
राजू गवळींचे नगरसेवक पद धोक्यात
By admin | Published: June 05, 2016 12:49 AM