अशोक पाटील, इस्लामपूर शरद पवार यांचे पानिपत होणार आणि राजू शेट्टी यांना केंद्रीय कृषिमंत्रीपद मिळणार, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केला जात होता. निवडणुकीत भाजपचे बहुमत आणि राष्ट्रवादीचे पानिपत झाल्यानंतर मंत्रीपदासाठी शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी दिल्लीत तळ ठोकला आहे, परंतु पहिल्या टप्प्यात शेट्टी यांना मंत्रीपद मिळण्याची आशा धूसर झाल्याचे समजते. त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी नाराज होऊन गावची वाट धरली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पश्चिम महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगामास प्रारंभ झाला होता. उसाला तीन हजार रुपये दर मिळावा यासाठी शेट्टी यांचे आंदोलन पेटले होते. त्यामुळे या भागातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साखरसम्राटांनी शेट्टींचे आंदोलन मोडीत काढण्याचा चंग बांधला होता. त्यात प्रामुख्याने मावळते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आघाडीवर होते. त्यामुळेच आंदोलनानंतर झालेल्या आताच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात महायुतीतर्फे शेट्टी विरुध्द जयंत पाटील अशीच लढत मानली जात होती. शेट्टी यांच्या प्रचारसभांतून पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि शेट्टी यांना केंद्रीय कृषिमंत्रीपद मिळणार, असे दावे केले जात होते. निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच शेट्टींना मंत्रीपद मिळणार, असे गृहित धरून शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली, परंतु नरेंद्र मोदी यांनी शेट्टी यांची अजूनही दखल घेतली नसल्याचे समजते. सध्या केंद्रात भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी पक्षातील खासदारांना मंत्रीपद मिळणे अवघड आहे. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव राजू शेट्टीच निवडून आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी त्यांना संधी मिळणे कठीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजू शेट्टींना मंत्रीपदाची संधी धूसर
By admin | Published: May 24, 2014 12:25 AM