इस्लामपूर : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी शिरोळ मतदार संघात जाऊन संपर्क वाढवला आहे. शेट्टी यांचा वाळवा तालुक्यात संपर्क असला तरी, परिसरातील प्रश्न मार्गी लागण्यासाठी इस्लामपूर पालिकेच्या इमारतीलगत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दि. ३ रोजी दुपारी २ वाजता होत आहे.शेट्टी यांनी फंडातून अनेकवेळा विकासकामे करण्यासाठी निधी दिला; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याला विरोध करत त्यांचा निधी स्वीकारला नाही. शेट्टी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्त्यांसाठी निधी मिळवला होता. परंतु राष्ट्रवादीने हे काम करू दिले नाही. पालिकेत झालेल्या सत्तांतरानंतर नगरसेवक वैभव पवार यांनी रस्त्याचे काम पूर्ण केले. हे काम करतानाही स्वत:च्या मिलसमोरील रस्ता करून घेतला, परंतु बाजार समितीतील मुख्य रस्त्याचे काम झालेच नाही. त्यामुळे व्यापारी वर्गातून नाराजीचा सूर आहे.शेट्टी यांनी आपल्या फंडातून महाडिक गटाचे नगरसेवक अमित ओसवाल, शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांच्या प्रभागासाठी आणि राष्ट्रवादीचे अपक्ष उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या प्रभागातील रस्तेकामांसाठी प्रत्येकी ७७ लाख रुपयांचा निधी देऊन रयत क्रांतीवर कुरघोडी केली आहे. ऊस उत्पादकांच्या उसाचे वजन करण्याची सुविधा इस्लामपूर येथे उपलब्ध होण्यासाठी १७ लाख ६० हजारांच्या निधीची तरतूद केली आहे. परंतु पालिकेने वजन-काट्यासाठी जागा दिली नसल्याने हा निधी शिल्लक आहे. वाळवा-शिराळ्यातील शेतकºयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इस्लामपूर येथे नव्याने संपर्क कार्यालय सुरु होणार आहे. शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीचे राजू शेट्टींना लागले वेध : सदाभाऊंना शह, इस्लामपुरात संपर्क कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:28 AM