शिराळा : गेली पाच-सहा वर्षे शिराळ्यातील नागपंचमीबाबत केवळ आश्वासन दिले जाते. येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखलही न घेणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना शिराळा शहरात प्रवेशास बंदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही शिराळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.दि. २९ जूनपासून राजेंद्र माने यांनी सुरू केलेले उपोषण सोडल्यावर दि. २ जुलैपासून चक्री उपोषण सुरू आहे. नागपंचमीबाबत २००२ पासून निर्बंध आहेत. त्याचबरोबर दरवर्षी खासदार शेट्टी नागपंचमीबाबत आपण लोकसभेत प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन देत आहेत. मात्र अद्यापही त्यांनी लोकसभेत नागपंचमीबाबत काहीही प्रयत्न केलेले नाही. सध्या शिराळ्यात बंद आंदोलन तसेच उपोषण चालू आहे. मात्र याकडेही शेट्टींनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे त्यांना शिराळा शहरात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी सरपंच गजानन सोनटक्के म्हणाले की, गतवर्षी आम्हाला दिल्ली येथे केंद्रीय वनमंत्री व सचिव यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी बोलाविले. मात्र आम्ही दिल्लीत गेल्यावर मंत्री राहू देत, खुुद्द खासदार शेट्टींनीच आमची भेट घेतली नाही. त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या कार्यालयीन अधिकाऱ्यास ‘नागपंचमीबाबत माझ्या लक्षात आहे, आलेल्या सर्वांना परत जायला सांगा’, असा निरोप दिला. शिराळकरांना टोलवत ठेवण्याचा हा प्रकार आहे.बैठकीत शेट्टी यांना शिराळ्यात प्रवेश बंदीबरोबरच शनिवारपासून शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको तहकूब करण्यात आला.या बैठकीस सरपंच गजानन सोनटक्के, उपसरपंच बाबा कदम, केदार नलवडे, अजय जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, प्रमोद पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शिराळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज संतोष कदम, चेतन पाटील, समीर मेहत्तर, अनिल माने, विक्रांत पवार, पोपट कदम, शिवतेज सपाटे, अविनाश खोत, पृथ्वीसिंग नाईक, गणेश माने आदी चक्री उपोषणास बसले होते. दि. २ जुलै रोजी रात्री ८ वाजता अंबामाता मंदिरामध्ये ग्रामस्थ, नाग मंडळाचे कार्यकर्ते यांची बैठक पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये त्यांनी, आपण शिराळा गावातील वीस हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देऊन, येथील नागपंचमीबाबतची परंपरा टिकावी, यासाठी खास आदेश मिळावा व नागपंचमीदरम्यान सूट मिळावी, अशी मागणी करणार आहे. सध्या होणारे आंदोलन शांततेने करण्याचे आहे, असे सांगितले. या बैठकीस सरपंच सोनटक्के, माजी सरपंच प्रमोद नाईक, संभाजी गायकवाड, प्रमोद पवार, विश्वप्रताप नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजित नाईक, सुनील कवठेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
राजू शेट्टी यांना शिराळा प्रवेशास बंदी
By admin | Published: July 03, 2015 11:55 PM