सांगली : येथील नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना, तर राजमती पाटील जनसेवा पुरस्कार नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला.
येत्या शुक्रवारी, २८ रोजी सांगलीतील राजमती भवन येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राजमती पाटील ट्रस्टचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचे पुरस्कार कृषी क्षेत्राला अर्पण करण्यात आले आहेत. रोख २५ हजार, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी जे. बी. पाटील (पुणे) यांचाहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.पाटील म्हणाले की, १९९२ पासून श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, साहित्यिक, धार्मिक, तळागाळातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्काराचे २९ वे वर्ष आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी गेली २६ वर्षे शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहेत.
देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्रित करून ही चळवळ संपूर्ण देशभर नेण्याचे कार्य केले आहे. त्यांनी संसदेमध्ये वेळोवेळी शेतकऱ्यांचे तसेच कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. जिल्हा परिषद ते खासदार व्हाया विधानसभा, असा राजकीय आलेख उंचावणारे शेट्टी हे दूध, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले.
कर्जमाफी, हमीभाव, स्वामिनाथन् समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतीमालाची आयात-निर्यात आदी मुद्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.स्वाभिमानी अॅग्रो प्रॉडक्टस् कंपनी सुरू करून कम्युनिटी फार्मिंगचा अभिनव प्रयोग केला. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरसह विविध पुरस्कारांनी शेट्टी यांना गौरविण्यात आले आहे.राजमती नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्काराचे मानकरी असलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी २०११ मध्ये परिसरातील सर्व शेतकºयांचे एकत्रित व्यावसायिक मॉडेल म्हणून सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी सुरू केली. आज हा प्रकल्प ७ हजार शेतकरी उत्पादकांशी संलग्न असून, विविध फळे व भाजीपाला पिकांतर्गत १५ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर नियंत्रण आहे. ही भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी शेतकऱ्यांची कंपनी बनली आहे.
याठिकाणी दैनंदिन ८५० टन फळे, भाजीपाला हाताळणीची सुसज्ज यंत्रणा आहे. ६५ एकर जमिनीवर शेकडो कोटींची गुंतवणूक करून शिंदे यांनी शीतसाखळी आणि फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. या प्रकल्पात फळभाज्यांचे निर्जलीकरण, आंबा प्रक्रियाही यशस्वीरित्या होते. केंद्रीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे ते केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य, तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य कृषी निर्यात धोरणाचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.