सांगली : राज्यातील ऊस वाहतुकदारांची कोट्यवधीची फसवणूक होत असताना साखर संघ, पोलिस खाते काय करते? असा सवाल करीत ऊस वाहतुकदारांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टरसह धडक देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.
सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर ऊस वाहतुकदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेट्टी बोलत होते. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅलीचे रुपांतर मेळाव्यात झाले. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले की, साखर उद्योगात वाहतुकदारांना कुठेच स्थान नाही. साखर कारखानदारांनी वाहतुकदारांचा स्वार्थासाठी वापर केला. वाहतूकदार संघटना काढून कोट्यवधीचे घोटाळे केले. पण वाहतुकदारांची फसवणूक होताना त्यांची जबाबदारी घेतली नाही. साखर संघानेही तेच केले. साखर संघाचे अध्यक्ष तर सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांना भेटण्यास वेळ नाही. वाहतुकदारांनी मनात आणले तर साखर संघालाही गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतात. त्यांनी ऊसाची वाहतुक करायची नाही, असे ठरविले तर कारखानदार त्यांच्या आलिशान गाड्यातून ऊस आणणार आहेत का? ऊस वाहतुकदार एकवटल्याने शासनालाही जाग आली आहे. फसवणूक करणाऱ्या मुकादमावर गुन्हे दाखल होत आहेत. पण यावर न थांबता शासनाने अध्यादेश काढावा, ऊस वाहतुकदारांच्या मागण्याची पूर्तता करावी, यासाठी प्रसंगी साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टरसह धडक देऊ, असेही शेट्टी म्हणाले.