राजू शेट्टी यांची कॉँग्रेस आघाडीशी सलगी : शिराळ्यात राजकारणाला कलाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:10 AM2018-07-13T00:10:06+5:302018-07-13T00:11:05+5:30
दूध आंदोलनास पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी शिराळा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. बुधवारी शिराळा तालुक्यात खा. शेट्टी यांनी दौरा केला
अशोक पाटील ।
इस्लामपूर : दूध आंदोलनास पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी शिराळा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. बुधवारी शिराळा तालुक्यात खा. शेट्टी यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपला बगल देत राष्ट्रवादीचे माजी आ. मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या विविध संस्थांना भेटी देऊन सत्कारही स्वीकारला.
त्यांच्या या भूमिकेमुळे वाळव्यापाठोपाठ आता शिराळा मतदार संघातील त्यांनी आघाडी काँग्रेसची सलगी केल्याचे स्पष्ट होत आहे. यामागे आगामी लोकसभा निवडणूक हेच कारण असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
शेतकऱ्यांचे नेते म्हणून सत्तेत आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली. परंतु या संघटनेत कार्यकर्त्यांची वानवा होती. त्यामुळे त्यांना भाजपचा आसरा घ्यावा लागला. त्यांचे विरोधक म्हणून खा. राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांची बाजू घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु वाळवा-शिराळ्यात शेट्टी यांच्या होणाºया मेळाव्यास दिवसेंदिवस गर्दी कमी होऊ लागली आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांवरील शेतकºयांचा उडालेला विश्वास हेच प्रमुख कारण आहे. यामुळेच खा. शेट्टी यांनी आता आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आघाडीला जवळ केले आहे.
खा. शेट्टी यांनी बुधवारी दिवसभर शिराळा मतदार संघाचा दौरा केला. प्रथम त्यांनी प्रशासकीय कार्यालयानजीक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर काँग्रेस आघाडीची सत्ता असलेल्या शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन सत्कार स्वीकारला. तेथूनच ते काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सह्याद्री खरेदी-विक्री संघास भेट दिली. तेथेही त्यांनी सत्कार स्वीकारला.
चिखली येथे खासदार फंडातून झालेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मात्र आ. शिवाजीराव नाईक यांचे पुत्र, सुनंदा दूध संघाचे अध्यक्ष सत्यजित नाईक उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर त्यांनी विश्वास सहकारी साखर कारखान्यानजीक असलेल्या माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या दिवसभराच्या कार्यक्रमात त्यांनी भाजपला पूर्णपणे बगल दिल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. यापूर्वीही आष्टा परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शेट्टी यांनी हजेरी लावली होती. काही दिवसांनी राजारामबापू दूध संघालाही भेट दिली. त्यानंतर शिराळ्यातही राष्ट्रवादी व काँग्रेसशी संपर्क साधून त्यांनी आंदोलनाविषयी चर्चा केली. यामागे आगामी लोकसभा निवडणूक हेच कारण असून, आता खा. शेट्टी काँग्रेस आघाडी पुरस्कृत उमेदवार असतील, या चर्चेला उधाण आले आहे.
चर्चा रंगली...
खा. राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाच्या निमित्ताने कॉंँग्रेस आघाडीशी वाढवलेली सलगी म्हणजे शिराळ्यातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. आता वाळवा-शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.