अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यात काट्याची लढत होण्याचे संकेत आहेत. महायुतीकडून माने यांचे नाव निश्चित मानले जात आहे. शेट्टी यांना महाविकास आघाडीचा अर्थात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळाला आहे. शेट्टी यांनी काट्याने काटा काढण्याची रणनीती आखली आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय पारा चढणार आहे.गत निवडणुकीत धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून अर्थात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. याला भाजपचाही पाठिंबा होता. यावेळी मात्र माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच राग उद्धव ठाकरे यांच्या गटाला आहे. ठाकरे गटाने राजू शेट्टी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची खेळी केली आहे. ठाकरी दणक्यानेच विरोधकांना रोखण्याचा डाव शेट्टी यांचा असल्याचा बोलले जाते.
गेली चार दिवसांपासून राजू शेट्टी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. दि. १७ रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठीच सोडला असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांचा फौजफाटा शेट्टी यांच्या पाठीशी राहणार असल्याने ऊस उत्पादकांची ताकद पुन्हा शेट्टी यांना मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची ताकद धैर्यशील माने यांच्या पाठीशी असणार आहे. ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या या दोघांच्या काट्याच्या टकरी होऊन राजकीय पारा वाढणार आहे.
आपण लोकसभेची हवा सुरू झाल्यापासूनच हातकणंगलेतून तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून मलाच उमेदवारी मिळणार आहे. पक्षाच्या नेत्यांनी तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. -धैर्यशील माने, खासदार, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ.
आपण स्वबळावर लढणार आहोत. परंतु, महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या ताकदीबरोबर ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मला सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. -राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.