कासेगाव : केदारवाडी (ता. वाळवा) येथे एका घरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेला ९१ लाख रुपये किमतीचा रक्तचंदनाचा साठा कासेगाव पाेलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी संशयित विजय बाळासाहेब तांबवे (वय ३०, रा. केदारवाडी) व इव्हनेश भैय (पूर्ण नाव नाही) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.केदारवाडी येथील केदारवाडी-काळंमवाडी रस्त्याच्या उत्तरेस गोसावी समाजाच्या वस्तीलगत असणाऱ्या जयकर तुकाराम पाटील यांच्या मालकीच्या घरात संशयित विजय पाटील व इव्हनेश भैय यांनी विक्रीच्या उद्देशाने रक्तचंदन लाकडाचे ओंडके बेकायदेशीररीत्या आणल्याची माहिती कासेगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अनिल पाटील, दीपक हांडे, दीपक घस्ते, आनंद देसाई यांना मिळाली. त्यांनी त्वरित सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना कळविले. दीपक जाधव यांनी पोलिस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वनरक्षक एस.टी. वाघमारे, वन विभागाच्या पथकासह रविवारी दुपारी जयकर पाटील यांच्या घरावर छापा टाकला. घटनास्थळी रक्तचंदनाचे एकूण ७५८ किलाे वजनाचे २० लाकडी ओंडके मिळून आले. बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ९१ लाख ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.याप्रकरणी कासेगाव पोलिसांनी संशयित विजय तांबवे व इव्हनेश भैय यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Sangli Crime: केदारवाडीत ९१ लाखांचा रक्तचंदन साठा हस्तगत, दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 4:10 PM