लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रमजान मुल्ला यांचा कवितेमध्ये तगडा आत्मविश्वास आहे. ती संत कबीर, तुलसीदास, प्रेमचंद, गालिब, शेख महंमद बाबा यांच्याशी नाळ जोडणारी असून, धर्माचा शोध नव्हे धर्माचा बोध शोधणारी कविता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अनुवादक प्रा. बळवंत जेऊरकर यांनी केले.
शब्दसाहित्य विचारमंच आणि मराठी लेखक संघटना यांच्या वतीने नागठाणे (ता. पलूस) येथील कवी रमजान मुल्ला यांच्या ‘अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टान्त’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रा. बळवंत जेऊरकर यांच्या हस्ते, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अविनाश सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली व कवी आबा पाटील यांच्या उपस्थितीत सांगली येथील निवारा केंद्रात पार पडला.
या वेळी प्रा. सप्रे म्हणाले की, कवितेचे सौंदर्य मनुष्यतेच्या अविष्कारात दडलेले आहे. कवी रमजान मुल्ला यांची कविता सर्जनशील आहे जी वाचल्यानंतर अस्वस्थपणा निर्माण करून माणसाला बदलायला भाग पाडते.
आबा पाटील म्हणाले की, कवितेच्या विश्वातील रमजान मुल्ला हा मैफलीचा सूर सापडलेला कवी आहे. कविता चिरकाल टिकण्यासाठी कवीने प्रत्येक शब्दाचा ध्यास घेतला पाहिजे.
स्वागत व प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी, परिचय हिंमत पाटील यांनी, तर लता ऐवळे-कदम यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रतिभा जगदाळे यांनी मानले.
या वेळी प्रा. भीमराव धुळूबुळू, नामदेव भोसले, मुस्तफा मुजावर, ज्योती सरवदे, डॉ. अनिता खेबूडकर, विजय जाधव, संजय पाटील, दयासागर बन्ने, बाबा परीट, सुधीर कदम, महादेव माने, सचिन पाटील, नितीन माळी, प्रा.संतोष काळे, दीपक स्वामी, अस्मिता इनामदार आदी उपस्थित होते.
चौकट
प्रत्येक शब्द म्हणजे माझे अश्रू
रमजान मुल्ला म्हणाले की, दुःखाशी संघर्ष करीत माझा प्रवास सुरू आहे. या कविता संग्रहात आलेला एक एक शब्द म्हणजे माझे अश्रू आहेत. माझ्या या पहिल्या कविता संग्रहाचे वाचक स्वागत करून मला आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा आहे.